मानवी जीवन जगत असताना आपल्याला अनेकदा विविध भूमिका पार पाडाव्या लागतात. त्या भूमिका पार पाडत असताना बर्याचदा आपल्याला निर्णय घेण्याची गरज पडत असते. हेच निर्णय घेण्यासाठी तसेच आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी आपल्याला प्रेरणेची गरज भासते. प्रेरणा ही कोणतेही कार्य करण्यासाठी आपल्याला एक बळ देते. याच प्रेरणेने वेगवेगळ्या परिस्थितीचा सामना करणे सोपे जाते. एखादा अवघड निर्णय घेणही यामुळे शक्य होतं. प्रेरणेच्या बळावरच अनेक लोकांनी इतिहास रचला. माणसाला काहीही करण्यासाठी एक आंतरिक शक्ति मदत करते तिलाच प्रेरणा असे म्हणतात . दुर्गम भागात जेथे शिक्षणाची सोय नाही अशा अवस्थेत मैल न मैल प्रवास करून शिक्षण घेऊन कष्ट सोसून एखाद्याने त्या क्षेत्रात नाव करावं हे फक्त प्रेरणेमुळेच शक्य होते. प्रेरणा निर्माण झाली म्हणजे ती पूर्ण करण्यासाठी माणूस धडपड करू लागतो व त्यामुळेच ती प्रेरणा पूर्ती होऊन त्याला त्या प्रयत्नाचे समाधान मिळते. अर्थात या प्रेरणा जैविक , सामाजिक किंवा अबोधही असू शकतात . कोणत्याही विशिष्ट वर्तनाच्या मुळाशी असलेली कारणे सहजपणे दिसून येत नाहीत तेव्हा हे वर्तन विशिष्ट प्रेरणांमुळे घडून आलेल...